(रत्नागिरी /:प्रतिनिधी)
“ज्या शिवसेनेत मी राजकारणाची सुरुवात केली, त्या पक्षाचा आज होत असलेला ऱ्हास पाहून मन विषण्ण होते. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आवाज होता. मात्र, आज पूर्वीची शिवसेना उरलेली नाही,” अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी खंत व्यक्त केली. गुरुवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “ऑपरेशन टायगर भाजपसाठी किती धोकादायक ठरेल, हे परिस्थितीनुसार स्पष्ट होईल. मात्र, त्यामध्ये वाघाचे गुणधर्म तरी कुठे दिसले?” असा मिश्कील सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार संजय पाटील यांच्या अटकेची मागणी करताना खासदार अमित शहा यांच्यावरही टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानावर भाष्य करताना राणे यांनी “संजय राऊत हे खासदार आहेत. त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे कितपत योग्य आहे?” असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. “आजारपणामुळे ते अशी वक्तव्ये करत असावेत,” असा टोला देखील त्यांनी लगावला. दोन्ही शिवसेनांबाबत अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. “कोकणात भारतीय जनता पक्ष संघटनात्मकदृष्ट्या सक्षमपणे काम करत आहे. पक्षात अनेक सक्षम आणि कार्यक्षम कार्यकर्ते आहेत,” असे ते म्हणाले. राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसल्याच्या प्रश्नावर राणे यांनी चिंता व्यक्त केली. “लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी प्रभावी विरोधी पक्ष आवश्यक असतो. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत ती उणीव प्रकर्षाने जाणवत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
महामार्गासह विविध विकासकामांचा आढावा घेतल्याचे सांगताना राणे म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम १६ जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. या विलंबाबाबत संबंधित यंत्रणांकडून सविस्तर माहिती घेतली जाईल. तसेच जलजीवन मिशन, बीएसएनएल सेवा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कुपोषण, जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न आणि रत्नागिरी विमानतळाच्या कामांचाही अधिकाऱ्यांसोबत आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘अणुऊर्जा प्रकल्पाशिवाय औद्योगिक विकास अशक्य’
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करताना राणे म्हणाले, “वीजेशिवाय उद्योग उभे राहू शकत नाहीत आणि उद्योगांशिवाय बेरोजगारी दूर होणार नाही. अणुऊर्जा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. आतापर्यंत कोकणातील अनेक विकास प्रकल्पांना विरोध झाला; मात्र त्यातून प्रदेशाचा विकास साधला गेला नाही. अणुऊर्जा प्रकल्प उभारला गेला असता तर राज्याला पुरेशी वीज आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

