(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी, वाढती स्पर्धा आणि भविष्यातील चिंतेमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे 19 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (19 ऑगस्ट 2026) घडली. सूरज सुभाष शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज गेल्या काही महिन्यांपासून NEET परीक्षेची तयारी करत होता. तो अभ्यासात हुशार आणि शांत स्वभावाचा असल्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी सांगितले. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मेहनत घेत होता. मात्र, NEET परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने तो मानसिक तणावात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी सूरज नेहमीप्रमाणे अभ्यासासाठी घरातील खोलीत गेला होता. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. त्यानंतर तो गंभीर अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांना विद्यार्थ्याने लिहिलेली एक चिठ्ठीही आढळून आली असून, तिच्या आधारे तसेच अन्य बाबींच्या तपासातून घटनेमागील परिस्थितीचा शोध घेतला जात आहे. या चिठ्ठित असे लिहिले आहे की, “सॉरी आई आणि आप्पा… नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेन… काळजी घ्या आणि आनंदी राहा…” चिठ्ठित लिहिलेल्या या मजकुरावरून सूरजने नैराश्यातून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
सूरजच्या मृत्यूने खंडाळा आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलगा डॉक्टर व्हावा आणि त्याने कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करावे, यासाठी तो मेहनत घेत होता. मात्र, स्पर्धात्मक परीक्षेचा ताण आणि अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर किती गंभीर परिणाम करू शकते, याकडे या घटनेने पुन्हा लक्ष वेधले आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेतील अपयश किंवा अपेक्षेपेक्षा कमी गुण याकडे आयुष्याचा शेवट म्हणून न पाहता कुटुंबीय, शिक्षक किंवा विश्वासातील व्यक्तींशी मोकळेपणाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

