(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे येथील धनगरवाडी परिसरात बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी सखाराम आब्या कोलापटे यांची पाळीव गाय ठार झाल्याची घटना घडली. सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास आंब्याचा माळ गवळीवाडी परिसरात ही घटना घडली. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सखाराम कोलापटे हे नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी जंगलालगतच्या आंब्याचा माळ परिसरात घेऊन गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एका गायीवर झडप घातली. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सखाराम कोलापटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच बापू लोटणकर यांनी तातडीने स्थानिक आमदार किरण सामंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. आमदार कार्यालयानेही तत्काळ दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा पूर्ण केला. तसेच वनविभागाच्या नियमांनुसार बाधित शेतकरी सखाराम कोलापटे यांना शासनाकडून लवकरात लवकर योग्य ती आर्थिक भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी माजी उपसरपंच बापू लोटणकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, वनरक्षक सुप्रिया काळे आणि रमेश बावदाने उपस्थित होते. दरम्यान, मानवी वस्तीजवळ भरदिवसा बिबट्याने जनावरावर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेता वनविभागाने गस्त वाढवून त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


