(रत्नागिरी)
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते जयसिंग (आबा) घोसाळे यांना अपार दुःखाचा धक्का बसला आहे. त्यांच्या मोठ्या चिरंजीवांचा काल रात्री १२.३० वाजता दापोली येथे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ते दापोली येथे सासरवाडीला गेले होते.
अमित जयसिंग घोसाळे (वय ४५) हे आंबा व्यवसायात सक्रिय होते. काल ते सासरवाडीला दापोली येथे गेले असताना, रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही क्षणांतच त्यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
अमित घोसाळे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि घोसाळे परिवारावर शोककळा पसरली आहे.
सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे, आणि ही घटना त्याचेच एक गंभीर उदाहरण ठरते.
अंत्यविधी आज सकाळी ११.३० वाजता त्यांच्या मूळगावी पार पडणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

