(रत्नागिरी)
एका विवाहितेच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार करून तिच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणींशी अश्लील भाषेत चॅटिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ३२ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मार्च ते ५ जून २०२५ या कालावधीत अज्ञात व्यक्तीनं तिच्या नावाने बनावट खाते तयार केले. या खोट्या खात्याद्वारे तिच्या ओळखीतील लोकांशी संपर्क साधून अश्लील आणि बदनामीकारक संवाद साधण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ७९ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून या सायबर गुन्ह्याचा गंभीरतेने तपास सुरू असून, बनावट खाते उघडणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर शाखेचीही मदत घेतली जात आहे.