(दापोली / वार्ताहर)
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि विविध मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे प्रश्न राज्य शासनापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी दापोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) संतोष साखरे आणि भाजपा आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडता याव्यात, त्यांचे प्रश्न संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविता यावेत आणि त्यावर कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा करता यावा, या उद्देशाने ‘सेवा अभियान’ घेण्यात आले. यावेळी विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्या उपस्थित मान्यवरांसमोर मांडल्या.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढेही उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जालगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम भाऊ इदाते, भाजपा जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जया साळवी, भाजपा ग्रामविकास व पंचायत राज सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजपा सोशल मीडिया दापोली तालुका संयोजक धिरज पटेल, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, शशांक सिनकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

