(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखेची विशेष सभा रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.
या विशेष सभेस कोमसाप कार्यकारिणी सदस्य, कवी केशवसुत स्मारक समितीचे सदस्य, मालगुंड ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ब. प. विद्यालय, मालगुंडचे मुख्याध्यापक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून संबंधित कार्यक्रमांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत.
२३, २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषदेबाबत सभेत सविस्तर माहिती देऊन नियोजन करण्यात येणार आहे. तसेच २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मालगुंड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या केंद्रीय साहित्य संमेलनाबाबत माहिती देण्यात येणार असून, निवड झालेल्या समित्या आणि त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांबाबत वरिष्ठांकडून सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय ‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमांतर्गत निवड झालेल्या दालनांना मंजुरी मिळाल्याबाबतही सभेत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. मंजूर दालनांमध्ये ब. प. विद्यालय मालगुंड, संस्थान श्री देव गणपतीपुळे, बुद्धविहार मालगुंड, अमित प्रभाकर मेहंदळे, निनाद श्रीकर कोसुंबकर, मोरेश्वर गोविंद मुळ्ये, शेखर मधुकर खेऊर, R.D.C.C. Bank मालगुंड, आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १ आणि प्रभाकर मोरेश्वर घनवटकर यांचा समावेश आहे. या दहा दालनधारकांनी सभेला वेळेवर उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.
या महत्त्वाच्या सभेस कोमसाप मालगुंड शाखेच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शाखाध्यक्षा नलिनी खेर आणि सचिव विलास राणे यांनी केले आहे.


