(दापोली / वार्ताहर)
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरीची वारी ही लहान थोरांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. ९ ते ११ जुलै २०२६ रोजी दापोलीतील सायकलप्रेमींनी दापोली ते चिपळूण ते पंढरपूर असे ३००+ किमी अंतर सायकल चालवत सायकल वारी पूर्ण केली. पंढरपूर सायकलवारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून आरोग्य, पर्यावरण संवर्धन, शिस्त, चिकाटी आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देणारी प्रेरणादायी मोहीम आहे. “वारी आणि व्यायाम” यांचा सुंदर संगम घडवत हे सायकलस्वार श्रद्धा, समर्पण आणि सामाजिक जागृतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत आहेत.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आलेकर बंधू चिपळूण यांच्या तर्फे चिपळूण ते पंढरपूर या मार्गावर सायकल वारी आयोजित करण्यात आली होती. या सायकल वारी मध्ये दापोली सायकलिंग क्लबचे सुनिल रिसबूड, राजेंद्र नाचरे, प्रशांत पालवणकर, निनाद देवरुखकर, मंदार वझे, शौरी संदीप राणे, सुनिल शिंदे यांनी सहभागी होऊन सुखरुप पणे ही सायकल वारी पूर्ण केली. तसेच अंबरीश गुरव व प्रणव उनकुले यांनी पुणे ते पंढरपूर मार्गावर सायकल चालवत सायकल वारी पूर्ण केली. सायकल चालविणे हा सर्वात प्रभावी, सोपा आणि पर्यावरणपूरक व्यायाम मानला जातो.
याबद्दल अधिक माहिती देताना सुनील रिसबूड यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीमध्ये सहभागी व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही सायकल चालवत सायकल वारी केली. यासाठी आम्ही काही दिवसापासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.

