(दापोली)
पावसाळ्यातील मासेमारी बंदी आदेशाचे उल्लंघन करत रायगड आणि मुंबई येथून आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सनी हर्णे बंदरासमोर बिनधास्त मासेमारी सुरू केल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने १ जून ते ३० जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी घातलेली असताना देखील नियम धाब्यावर बसवत सुमारे १५ ट्रॉलर्सनी हर्णे किनाऱ्यापासून अवघ्या ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी सुरू ठेवली आहे. “नियम फक्त आम्हालाच का लागू होतात?” असा सवाल करत स्थानिक मच्छीमारांनी शासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आहे.
मासेमारी बंदीचा कालावधी म्हणजे मासळीच्या प्रजननाचा संवेदनशील कालखंड. मान्सून काळातील अस्थिर हवामान आणि समुद्रातील उधाण लक्षात घेता ही बंदी उपयुक्त मानली जाते. मात्र यंदा शासनाच्या आदेशांची सर्रास पायमल्ली होत असून त्याकडे जबाबदार यंत्रणांचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. हर्णे–पाजपंढरी परिसरात ही परिस्थिती बघता मच्छीमारांमध्ये भीतीचे आणि असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे, अशा परिस्थितीतही शासनाचा सुरक्षा ड्रोन अद्याप तैनात झालेला नाही.
स्थानिक मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय खात्याशी संपर्क साधण्याचे वारंवार प्रयत्न केले, मात्र कुठलाही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर आणि निष्क्रियतेवरही नाराजी व्यक्त होत आहे. हर्णे बंदर कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, आम्ही सर्व नियम काटेकोरपणे पाळतो. पण आमच्या समुद्रात बाहेरचे ट्रॉलर्स बिनधास्त मासेमारी करत आहेत. यंत्रणा पूर्णतः निष्क्रिय आहे. जर अशीच स्थिती राहिली, तर मच्छीमार कायदा हातात घेण्यास भाग पडतील.
तर स्थानिक मच्छीमार अनंत चोगले यांनीदेखील तीव्र शब्दांत रोष व्यक्त करत म्हटले की, “आम्हालाच नियम लागू आणि बाहेरून आलेल्यांना मोकळं रान? आता याचा जाब कोणाला विचारायचा आणि आम्ही आता कुणाकडे पाहायचं? शासन आहे कुठे?”
हर्णे परिसरातील मच्छीमार समाजात वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, आणि अवैध मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा, समुद्रातील संघर्ष अधिक उग्र स्वरूप धारण करेल, असा इशारा स्थानिक मच्छीमारांनी दिला आहे.

