( रत्नागिरी / वार्ताहर )
कसोप ते कोळंबे फाटा मार्गावर जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतून विभागीय स्पर्धेसाठी सायकलपटूंची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचे कार्यकारिणी सदस्य चेतन साळवी आणि मुख्याध्यापिका नेत्रा राजेशिर्के यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक (व्हॉलीबॉल) गणेश खैरमोडे यांनी स्पर्धेचे संयोजन केले, तर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने तांत्रिक सहकार्य केले.
टाईम ट्रायल प्रकारातील १४ वर्षे मुलांच्या गटात शिवम आलदर (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण) याने प्रथम, तर अधिराज कवितके (जीजीपीएस, रत्नागिरी) याने द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षे मुलींच्या गटात मृणाल आलदर (युनायटेड इंग्लिश स्कूल) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
१७ वर्षे मुलांच्या टाईम ट्रायल गटात आयुष शिंदे (ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली) प्रथम, वरद कदम (ज्ञानदीप विद्यामंदिर) द्वितीय आणि ईशान वझे (आगवेकर विद्यालय, चिपळूण) तृतीय ठरले. १७ वर्षे मुलींच्या गटात आध्या कवितके (अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) हिने प्रथम क्रमांक मिळवला.
१४ वर्षे मुलांच्या मास स्टार्ट प्रकारात रुद्र जाधव (जीजीपीएस) याने प्रथम, तर दिशांत पवार (एलटीटी इंग्लिश स्कूल, खेड) याने द्वितीय क्रमांक मिळवला. टाईम ट्रायल प्रकारात स्वराज राजपुरकर (संतोषभाई मेहता स्कूल, खेड) आणि श्रावणी खानविलकर (श्रमिक विद्यालय, शिवार आंबेरे) यांनीही सहभाग घेतला.
स्पर्धेच्या आयोजनासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे उपाध्यक्ष दर्शन जाधव यांच्यासह सदस्य विशाल भोसले, प्रसाद देवस्थळी, प्रसाद खेडेकर, विनायक पावसकर, प्रमोद लिंगायत, नारायण पाटोळे, हृषिकेश पुरोहित, अमित पोटफोडे, केदार देवस्थळी, उत्तम पवार आणि मकरंद पटवर्धन यांनी सहकार्य केले. तसेच चिपळूणचे श्रीनिवास गोखले आणि खेडमधील सिद्धेश बांदिवडेकर यांनीही सहकार्य केले.
संस्थाध्यक्ष कमलाकर साळवी आणि सचिव सागर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाने स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. जिल्हा रुग्णालयातर्फे रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, तर वाहतूक शाखेचे दोन पोलिसही कार्यरत होते.
स्पर्धेदरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सर्व स्पर्धकांचे स्वागत केले आणि त्यांचा उत्साह वाढवला. शाळेतर्फे स्पर्धक, पालक आणि स्वयंसेवकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली. दरवर्षी ही स्पर्धा याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही विद्यालयाने दिली.


