( गणपतीपुळे / वैभव पवार )
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गणपतीपुळे येथे शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणांहून पर्यटकांनी गणपतीपुळेला पसंती दिल्याने समुद्रकिनाऱ्यासह परिसरातील पर्यटनस्थळे गजबजली आहेत. याचबरोबर गणपतीपुळे येथे हिवाळी पर्यटन हंगामाला सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
हिवाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले वॉटर स्पोर्ट व्यवसायही सुरू झाले आहेत. जेसकी राईड, ड्रॅगन राईड, बनाना राईड, डिस्को राईड आदी जलक्रीडांना पर्यटकांकडून विशेष पसंती मिळत आहे.
गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी तसेच परिसरातील निसर्गरम्य स्थळांना भेट देण्यासाठी विविध भागांतून पर्यटक येऊ लागले आहेत. पावसाळी हंगामातही अनेक पर्यटकांनी गणपतीपुळेला भेट दिली होती. मात्र, आता हिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाल्याने समुद्रकिनाऱ्यावरील विविध पर्यटन व्यवसायांना पुन्हा वेग आला आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर ऑक्टोबर ते मे या कालावधीत विविध व्यवसायांना परवानगी असते. त्यामुळे वॉटर स्पोर्टबरोबरच फोटोग्राफी, एटीव्ही बाईक, उंट सफर आणि घोडेसफर आदी पर्यटन सुविधाही पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील शहाळी, सरबत आणि भेळ विक्रेते तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि अन्य छोटे व्यवसायही सुरू होत आहेत. त्यामुळे हिवाळी पर्यटन हंगामात गणपतीपुळ्यात येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन सुविधांचा आनंद घेता येणार आहे.
सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळ्यातील लहान-मोठे व्यवसाय पर्यटकांच्या गर्दीने भरुन गेले आहेत. पर्यटकांची वर्दळ वाढू लागल्याने समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.


