(रत्नागिरी / वार्ताहर)
ग्राहकांचा दृढ विश्वास आणि उत्कृष्ट व विनम्र सेवांच्या बळावर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३० सप्टेंबर २०२६ अखेर ₹६,००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. अर्धवार्षिक अहवालानुसार बँकेला ₹४९ कोटी १३ लाख ३६ हजार इतका नफा झाला असून, गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत नफ्यात ₹१० कोटी ७४ लाखांची घसघशीत वाढ झाली आहे.
राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून नावलौकिक असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहक सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देत डिजिटलायझेशनवर विशेष भर दिला आहे. बँकेमार्फत ग्राहकांना NEFT/RTGS, ATM, Mobile Banking आणि QR Code यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ग्राहकांसाठी काही दिवसांत AEPS सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. AEPS सुविधा देणाऱ्या राज्यातील तीन जिल्हा बँकांपैकी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक एक असून, या सुविधेमुळे ग्राहकांच्या सेवेत आणखी वाढ होणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत बँकेच्या ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या व्यवसायवृद्धीबद्दल बँकेचे सन्माननीय अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव तसेच सर्व संचालकांनी बँकेचे सभासद आणि ग्राहक यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच बँकेवरील असाच दृढ विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
संचालक मंडळाने घेतलेले अचूक निर्णय तसेच बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी सांगितले. बँकेने ₹६,००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


