(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण (Comprehensive Primary Health Care – CPHC) कार्यक्रम मालगुंड येथे उत्साहात संपन्न झाला.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना सर्वंकष, गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध १३ आरोग्य सेवांबाबत या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये गर्भधारणा, प्रसूती व प्रसूतीपश्चात काळजी, नवजात शिशू व अर्भक आरोग्य सेवा, बाल व किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, डोळे व कानांच्या समस्या, मौखिक आरोग्य, वृद्धापकाळातील आरोग्य सेवा, तात्कालिक वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य तसेच योग व आयुष उपचार पद्धतींचा समावेश होता.
या प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य पातळीवर नागरिकांना अधिक प्रभावीपणे आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्राप्त झाले. विविध आरोग्यविषयक समस्या ओळखून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याबरोबरच नागरिकांना प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सेवांचा लाभ देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, पंचायत समिती सदस्य पूर्वा दुर्गवळी, सरपंच श्वेता खेऊर, डॉ. शरण काठोळे, डॉ. सुनीता पवार, डॉ. नगमा गलबले, मुख्याध्यापक बिपीन परकर, प्रमोद लिंगायत, वीणा शिरगांवकर, साधना झोरे यांच्यासह आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल सूर्यवंशी आणि जिल्हा नोडल अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक तसेच आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

