(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील आदर्श जीवन शिक्षण मराठी शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा दैदिप्यमान कामगिरी करत गुणवत्तेचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा निकाल तब्बल १०० टक्के लागला आहे. या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे नाव शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे.
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा विद्यार्थी ओम विजय बाचीम याने उत्कृष्ट कामगिरी करत रत्नागिरी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे ओम बाचीम शासकीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भंडारपुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदा शाळेने केवळ एका वर्गापुरते यश मर्यादित न ठेवता इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवी या तिन्ही शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये १०० टक्के निकाल मिळवला आहे. एकाच वर्षी तीनही शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये शंभर टक्के यश मिळवण्याची ही कामगिरी शाळेसाठी विशेष अभिमानाची ठरली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापिका समिधा नितीन सावंत यांचे खंबीर नेतृत्व, योग्य नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. वर्गशिक्षक तानाजी माने आणि प्रीती करके यांनी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेत अथक परिश्रम घेतले. शिक्षकांनी घेतलेली मेहनत, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांनी दाखवलेला विश्वास यामुळे हे यश शक्य झाले, असे मुख्याध्यापिका समिधा सावंत यांनी सांगितले.
शाळेच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि पालकांकडून विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ आणि माता-पालक संघाच्या वतीने ओम विजय बाचीम याच्यासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

