भाजी विक्रेत्याच्या घरातून सुरू झालेला संघर्षमय प्रवास, देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेत प्रवेश, त्यानंतर यूपीएससीची कठीण शर्यत पार करून भारतीय पोलीस सेवेत स्थान ही कहाणी आहे २०१७ बॅचचे आयपीएस अधिकारी Nitin Bagate यांची. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा वेध घेताना ‘कर्तव्य, नवकल्पना आणि माणुसकी’ या त्रिसूत्रीवर उभा असलेला अधिकारी आपल्या समोर उभा राहतो.
अभाव, परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर शिक्षण पूर्ण करत त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही, तर पोलीस सेवेचा चेहरामोहराही बदलण्याचा प्रयत्न केला. Parbhani, Chandrapur आणि Ratnagiri यांसारख्या संवेदनशील ठिकाणी काम करताना दंगली नियंत्रणात आणणे, काही तासांत आरोपींना जेरबंद करणे, तणावपूर्ण परिस्थितीत संयम राखणे या कामगिरीमुळे त्यांची ‘डॅशिंग’ अधिकारी अशी प्रतिमा निर्माण झाली. पडेगाव, दौलताबाद परिसरातील तणाव हाताळताना त्यांनी दाखवलेली तत्परता विशेष ठरली. अन्न व दारू घोटाळे, एनडीपीएसअंतर्गत कारवाई, निवडणुकांदरम्यान गैरप्रकारांवर कडक नजर या सर्व आघाड्यांवर त्यांनी ठोस पावले उचलली.
VIDEO: बूट हातात घेऊन पाण्यातून चालले अन् वाटद MIDC विरोधातील ग्रामस्थांच्या भावना थेट ऐकल्या
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पारंपरिक पोलिसिंगला तंत्रज्ञानाची जोड दिली. २०२६ मध्ये जिल्ह्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली. प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवरून अवघ्या ३ टक्क्यांपर्यंत आणण्यात यश आले. सुमारे १६०० फिर्यादींना त्यांच्या तक्रारींच्या तपासाची माहिती नियमित देण्याची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. ‘मिशन प्रगती’मधून एसएमएस आणि व्हॉट्सअॅपद्वारे तपासाची माहिती देणे, ‘मिशन प्रतिसाद’मधून ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित हेल्पलाइन, तर ‘मिशन जीवन’अंतर्गत ५० हजारांहून अधिक ज्येष्ठांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवणे या उपक्रमांनी पोलिस दलाला मानवी चेहरा दिला. ५५ हजार ज्येष्ठांना प्रत्यक्ष मदत देत त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासारखा संवेदनशील उपक्रमही त्यांनी राबवला.
VIDEO: रत्नागिरी एसपी नितीन बगाटे यांची थेट पोलिस भरतीच्या मैदानात धाव, उमेदवारांचे मनोबल उंचावले
एआय आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा त्यांच्या कार्यशैलीचा वेगळा पैलू ठरला. विकृत मृतदेहांची ओळख पटवणे, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, वाँटेड आरोपींची माहिती मिळवणे या सर्व बाबींमध्ये एआय-आधारित अॅपची मदत घेण्यात आली. जीआयएस प्रणालीमुळे पोलिसांची तैनाती, लोकेशन ट्रॅकिंग आणि अलर्ट यंत्रणा अधिक सक्षम झाली. ‘डायल ११२’मधील त्रुटी दूर करून प्रतिसादक्षमता वाढवण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावर एआय-आधारित प्रकल्प राबवून जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न झाला; किनारपट्टी सुरक्षेसाठी Indian Coast Guard, Indian Navy, सीमाशुल्क विभाग आणि स्थानिक मच्छीमार यांच्यात समन्वय प्रस्थापित करण्यात आला.
VIDEO: पोलिस क्रीडा स्पर्धेत IPS नितीन बगाटे यांनी दोरी चढाई करून मजबूत मनोबलाचे घडवलं दर्शन
‘मिशन फिनिक्स’अंतर्गत अमली पदार्थांविरोधात निर्णायक लढा देताना १८० किलो कोकेन, ब्राउन हेरॉइन, गांजा आणि सायकोट्रॉपिक पदार्थ सुमारे ९८ कोटी रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. युवकांसाठी जनजागृती मोहीम, ड्रग कार्टेलवर छापे या बहुआयामी कारवायांनी जिल्ह्यात ठोस संदेश दिला. गावपातळीवर ‘मिशन पोलीस पाटील’ राबवत सीसीटीव्ही उभारणी, बॅरिकेड्स, सायबर फसवणूकविरोधी प्रशिक्षण या माध्यमातून १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत जनजागृती पोहोचवण्याचा प्रयत्न झाला.
VIDEO: मातीतले नाते जपणारे IPS अधिकारी नितीन बगाटे; चिखलात उतरून नांगरणी स्पर्धेत सहभाग
मोठी आंदोलने मराठा आरक्षण, बुद्ध लेणी मोर्चा, दिव्यांग व विद्यार्थी आंदोलने यांच्या काळात संवादप्रधान आणि संयमी पोलिसिंगचा आदर्श त्यांनी घालून दिला. कोविडकाळात २५ हजार प्रवासी मजुरांना मदत करताना त्यांनी ‘कर्तव्याच्या पलीकडे’ जाऊन काम केले. सर्व जाती-धर्मांच्या सणांमध्ये उपस्थित राहून ग्रामस्थांच्या आनंदात सहभागी होणे, तणावाच्या ठिकाणी स्वतः जाऊन परिस्थिती समजून घेणे यामुळे ते नागरिकांना आपलेसे वाटतात.
पदाचा बडेजाव न मिरवता, जमिनीवर उतरून काम करणारा अधिकारी ही त्यांची खरी ओळख आहे. नवकल्पना, तंत्रज्ञान आणि माणुसकी यांचा संगम घडवून रत्नागिरी जिल्ह्याला एक नवा पोलिसिंग मॉडेल देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा प्रवास केवळ एका अधिकाऱ्याचा गौरव नाही; तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या आणि समाजरक्षणाला जीवनधर्म मानणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी रत्नागिरीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
VIDEO: नव्या पोलिसांसोबत रत्नागिरीचे SP नितीन बगाटे ” झिंगाट” गाण्यावर थिरकले

