(रत्नागिरी)
“एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे..!” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत ३८ लाखांचा निव्वळ नफा आणि ९७.२० टक्के वसुली साध्य केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.
२०१८ साली स्थापन झालेल्या या पतसंस्थेने अल्पावधीतच ठोस आर्थिक वाटचाल करत सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. कोविडसारख्या कठीण काळातही संस्थेने स्थैर्य राखत सातत्याने प्रगतीचा वेग कायम ठेवला.
३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचा एकत्रित व्यवसाय ४० कोटी १७ लाखांवर पोहोचला आहे. यामध्ये ठेवी २३ कोटी ८९ लाख, कर्ज वितरण १६ कोटी २८ लाख, तर गुंतवणूक ९ कोटी ४४ लाख इतकी नोंदवली गेली आहे. संस्थेचा नेट एनपीए केवळ १.८४ टक्के इतका कमी असून आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा उत्तम नमुना संस्थेने दाखवून दिला आहे.
व्यवसाय वृद्धीदरातही संस्थेने उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. खेळते भांडवल २४.१७ टक्क्यांनी, स्वनिधी २१.४७ टक्क्यांनी, ठेवी २५.०३ टक्क्यांनी, कर्ज वितरण ३२.५८ टक्क्यांनी, गुंतवणूक ११.९१ टक्क्यांनी, तर निव्वळ नफा १७.९६ टक्क्यांनी वाढला आहे.
गेल्या सात वर्षांत संस्थेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुख सेवा यावर भर देत संस्था सातत्याने पुढे जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शाखा विस्तार आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत विश्वासार्ह सेवा देण्यावर संस्थेचा भर आहे.
संस्थेच्या या यशामागे सभासद, ठेवीदार, कर्मचारी आणि पदाधिकारी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद करत, आगामी काळातही एकजुटीने आणि प्रामाणिकपणे काम करत संस्थेला अधिक सक्षम बनवण्याचा निर्धार अध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केला आहे.

