(देवरुख / प्रतिनिधी)
ग्रामसभा तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित कामांसाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांची सचिव म्हणून नियुक्ती करू नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, तालुका संगमेश्वर यांनी केली आहे. याबाबत समितीच्या वतीने पंचायत समिती, संगमेश्वरचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान घडलेल्या गंभीर घटनेत एका सरकारी कर्मचाऱ्याला आपला प्राण गमवावा लागला होता. या दुर्दैवी घटनेचा सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभेचे सचिव म्हणून शिक्षकांना जबाबदारी देण्यास संघटनांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे.
ग्रामसभेतील विषय, कामकाज आणि निधी याबाबत शिक्षकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अशा जबाबदाऱ्या शिक्षकांवर सोपवल्यास ग्रामसभेदरम्यान अप्रिय किंवा हिंसक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, संगमेश्वर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत संबंधित शिक्षकांना अध्यापनाच्या जबाबदारीसोबत ग्रामपंचायतीच्या सचिवपदाचे काम सोपवणे अयोग्य असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही शिक्षक, मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख यांच्यावर ग्रामपंचायत सचिव म्हणून काम सोपवण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जुनी पेन्शन संघटना, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, प्रोटॉन संघटना, दिव्यांग शिक्षक संघटना, शिक्षक भारती आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांसह विविध शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांच्या सह्या आहेत.


