(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी सन २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सन २०२४ च्या तुलनेत गंभीर व मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली असून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. नितीन बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ‘तुलनात्मक वार्षिक गुन्हे आढावा’ बैठकीत ही माहिती समोर आली.
खून, खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतीसारख्या गुन्ह्यांमध्ये शंभर टक्के उघडकीचे प्रमाण साध्य करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि सोनसाखळी चोरीसारख्या गुन्ह्यांमध्येही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले असून २०२४ च्या तुलनेत त्यात २१ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यातही पोलिसांनी ठोस कामगिरी केली असून १ कोटी ३८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवत जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या ३९ प्रकरणांचा तात्काळ छडा लावण्यात आला.
महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये, विशेषतः विनयभंग व फसवणुकीच्या प्रकरणांत घट झाल्याचे चित्र असून फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणांच्या तपासासाठी असलेल्या ITSSO प्रणालीत १०० टक्के कार्यक्षमता साध्य करण्यात आली आहे. तसेच अवैध दारूधंदे व जुगार अड्ड्यांविरोधात राबविण्यात आलेल्या कारवाईत ८६५ दारूबंदी केसेस व १४० जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. ‘मिशन क्लीन’ अंतर्गत अमली पदार्थविरोधी कारवाईत मोठे यश मिळवत १८१ किलोहून अधिक अमली पदार्थांचा नाश करण्यात आला आहे.
सायबर गुन्ह्यांवरही प्रभावी कारवाई करत २० गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ५ लाख ६८ हजार रुपयांहून अधिक रक्कम पीडितांना परत मिळवून देण्यात आली आहे. तसेच बेपत्ता व्यक्ती व अपहरणाच्या प्रकरणांत मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून सर्व बालकांचा सुरक्षित शोध घेण्यात आला आहे.
तांत्रिक प्रणालींचा प्रभावी वापर, नागरिकाभिमुख उपक्रम, कठोर प्रतिबंधात्मक कारवाई आणि सातत्यपूर्ण गस्त यामुळे जिल्ह्यात सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे या आढाव्यात स्पष्ट झाले आहे. नववर्ष २०२६ मध्येही नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सज्ज व सक्षम राहण्याचा निर्धार रत्नागिरी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

