( खेड / वार्ताहर )
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे जिल्हाव्यापी आंदोलन होणार आहे.
१५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यता शासन निर्णयाच्या अनुषंगाने पदवीधर शिक्षकांचे उपशिक्षक पदावर करण्यात आलेले समायोजन, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गणित-विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी काढण्यात आलेली जाहिरात तसेच पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटींच्या प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून वर्षभरात अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा शिक्षक समितीचा आरोप आहे. या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षकांच्या ज्वलंत व जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात खेड तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे, यासाठी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, तालुका नेते बबन साळवी, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, प्रसिद्धीप्रमुख राजेश भागणे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खांडेकर, नरेश ठोंबरे, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, संतोष बर्वे आदी पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
दरम्यान, या आंदोलनाला खेड तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे प्रवक्ते शैलेश पराडकर व दिलीप यादव यांनी केले आहे.

