(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरातील मिरकरवाडा परिसरात १२ वर्षीय बालकासोबत गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून ५२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलाल सोलकर (वय ५२) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताची संबंधित अल्पवयीन बालकाशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने बालकासोबत गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार काही काळानंतर बालकाच्या पालकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पालकांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीची गांभीर्याने दखल घेत शहर पोलिसांनी संशयिताविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई करत संशयिताला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे. अल्पवयीन बालकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे.
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

