(संगमेश्वर /प्रतिनिधी)
कोसुंब-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात ३३ वर्षीय प्रतिक सावंत यांचा मृत्यू झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. अपघाताला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या ट्रकचालकावर कारवाई करूनच थांबू नका, तर बेकायदा चिरे वाहतुकीला जबाबदार असलेल्या ट्रकमालकावरही गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी आंबवलीसह परिसरातील ग्रामस्थांनी देवरूख पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले.
रस्त्यावर बेदरकारपणे धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे एखाद्या कुटुंबाचा आधारच हिरावला जात असेल, तर केवळ चालकावर कारवाई करून प्रश्न सुटणार कसा, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. चिऱ्यांची अनधिकृत वाहतूक आणि वाहतूक नियमांना हरताळ फासणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच लगाम घातला नाही, तर आणखी किती जीव जाण्याची वाट प्रशासन पाहणार?, असा सवालही यावेळी करण्यात आला. अपघाताचे वृत्त समजताच आंबवली आणि परिसरातील शेकडो ग्रामस्थ देवरूख पोलीस ठाण्यात दाखल झाले. ट्रकचालकावरील कारवाईसोबतच संबंधित ट्रकमालकाचीही जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत प्रतिक सावंत यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोसुंब-ताम्हाणे मार्गावर होणाऱ्या चिऱ्यांच्या वाहतुकीचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करून अवजड वाहने धावत असतील आणि त्यातून निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असतील, तर अशा वाहतुकीकडे प्रशासन किती काळ डोळेझाक करणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. रस्ते नागरिकांच्या जीवावर उठलेले वाहतुकीचे मार्ग नसून सुरक्षित प्रवासासाठी असतात. नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना लगाम घालणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असा संतप्त सूर ग्रामस्थांमध्ये उमटत आहे.
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ‘चालकावर कारवाई करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न नको; वाहतुकीमागील संपूर्ण साखळीची चौकशी करा,’ अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे देवरूख पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रतिक सावंत यांच्या मृत्यूला नेमकी कोण जबाबदार आहे, अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीमागे बेकायदा वाहतुकीचा सहभाग आहे का ? संबंधित ट्रकमालकाची भूमिका काय आहे, याची सखोल चौकशी होण्याची मागणी आता जोर धरत आहे. एका तरुणाचा जीव गेला आहे; त्यामुळे या अपघाताची केवळ नोंद करून प्रकरण बंद करण्याऐवजी जबाबदारीच्या प्रत्येक कडीपर्यंत पोहोचून कारवाई होणार का, याकडे आता संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

