(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर वीज उपकेंद्रातील पीटी (Potential Transformer) मध्ये अचानक बिघाड होऊन ब्लास्ट झाल्याने संगमेश्वर, देवरुख आणि साडवली उपकेंद्रांतून वीजपुरवठा होणाऱ्या विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर सेक्शनमधील वरिष्ठ तंत्रज्ञ कळंबटे आणि रमेश कदम यांनी तत्काळ सबस्टेशनमध्ये धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक तांत्रिक कार्यवाही सुरू केली. नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
या कार्यवाहीदरम्यान सबस्टेशनमधील सुरक्षा कर्मचारी चिमणे यांनीही आवश्यक सहकार्य केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून तसेच अथक प्रयत्नांमुळे रात्रीच्या वेळीच संगमेश्वर, देवरुख आणि साडवली उपकेंद्रांतून होणारा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात यश आले. या संपूर्ण कार्यवाहीला संगमेश्वरचे उपकार्यकारी अभियंता कौरवार यांचे मार्गदर्शन लाभले.
मध्यरात्रीची वेळ असतानाही नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाहीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. अचानक उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडावर प्रतिकूल परिस्थितीत तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कळंबटे, रमेश कदम, चिमणे तसेच उपकार्यकारी अभियंता कौरवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे मध्यरात्री वीजपुरवठा पूर्ववत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

