(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील तीन वर्षे प्रशासकीय राजवटीनंतर तब्बल आठवर्षानी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज शेवटच्या दिवशी अधिक वेगवान झाली. इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी आज कार्यालयात पाहायला मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसह कर्मचारी वर्गाचीही धावपळ झाली. या निवडणुकीत तिरंगी वा चौरंगी लढतीची होण्याची शक्यता दिसत आहे
देवरूख नगरपंचाय निवडणूकीत नगराध्यक्षपद व १७ प्रभागासाठी एकुण ८८ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कागदपत्रांची पूर्तता, आवश्यक प्रतिज्ञापत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक निवडणूक कार्यालयात मोठ्या संख्येने दिसत होते.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक वातावरणाला राजकीय ज्वर चढत असून विविध प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचारयंत्रणा तयारीसाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान, आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जांमधे नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदांसाठी चुरस वाढली आहे. अनेक प्रभागांत बहुरंगी लढती होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मतविभाजनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध पक्षीय नेत्यांमध्ये रणनीती ठरवण्यासाठी बैठका सुरू आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपा. शिवसेना ठाकरे गट, आप, तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तर नगरसेवक पदांसाठी विविध पक्षांच्या गट-गटांतील कार्यकर्त्यांनी जोरदारपणे अर्ज दाखल केले आहेत. युती व महाआघाडीत काही जागांचा तिढा असून तो लवकरच सुटणार की कसे, हे लवकरच स्पष्ट होईल.
आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी रीघ लागलेली दिसून आली. आता निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी अर्ज पडताळणी व स्वीकृती प्रक्रियेसाठी पूर्ण क्षमतेनं कामाला लागले होते.
आज अर्ज दाखल प्रक्रिया संपली आता त्यानंतरच्या छाननी व अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर नेमक्या अंतिम लढती कशा होतील हे स्पष्ट झालेवरच प्रचारात रंगत येईल. महायुतीत काहींनी अपक्ष अर्ज दाखल केले असल्याने या प्रभागातील बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ ठोस पावले उचलणार की आतून छूपा पाठींबा देणार? याकडे देवरूख शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

