(पुणे / वृत्तसंस्था)
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात वीजेचा धक्का लागून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. राहू गावाजवळील सोनवणेमळा येथे बुधवारी (दि. १९) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरातील कपडे वाळत घालण्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने ओम नितीन भोईटे (वय १८) आणि रोहित अनिल भोईटे (वय २१) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल भोईटे यांच्या घरात सकाळच्या सुमारास ओम भोईटे कपडे काढण्यासाठी लोखंडी तारेच्याजवळ गेला होता. त्यावेळी त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याने ओमला जोरदार विजेचा धक्का बसला. भावाला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच रोहित त्याच्या मदतीसाठी धावला. मात्र, ओमला वाचवण्याचा प्रयत्न करताना रोहितलाही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला.
दोन्ही तरुणांना विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांची आई सोनाली नितीन भोईटे यांनीही मुलांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनाही विजेचा धक्का बसला. दरम्यान, स्थानिक युवक शिवराज लक्ष्मण नवले यांनी प्रसंगावधान राखत सुती पोत्याच्या सहाय्याने विद्युत तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनाही किरकोळ विजेचा झटका बसला. त्यानंतर मेन स्विचमधील वायर तोडून वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे सोनाली भोईटे यांचा सुदैवाने जीव वाचला.
यानंतर ओम आणि रोहित यांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
ओम भोईटे याने विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पदवीचे शिक्षण सुरू केले होते, तर रोहित वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. दोघेही कष्टाळू आणि सामान्य कुटुंबातील असल्याचे स्थानिकांनी सांगितले. एकाच दुर्घटनेत दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याने भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती शिवराज लक्ष्मण नवले यांनी पोलीस ठाण्यात दिली. घटनेनंतर यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष सातगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महावितरणचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली आहे. या दुर्घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
पावसाळ्यात घरगुती तसेच शेती परिसरातील विद्युत यंत्रणा, तारा, मोटार आणि लोखंडी वस्तू हाताळताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विद्युत प्रवाहाचा संशय असल्यास कोणत्याही परिस्थितीत थेट हाताने वस्तूला स्पर्श न करता प्रथम मुख्य वीजपुरवठा बंद करणे आणि तातडीने महावितरण किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

