( मुंबई )
महानगरपालिका निवडणुकांतील मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.
महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील 29 महानगरपालिका आयुक्त, संबंधित पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची 6 व 7 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाघमारे यांनी सांगितले की, मतदान व मतमोजणीसाठी पुरेशा संख्येने प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान केंद्रांवरील व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था तसेच मतदारांसाठी आवश्यक सुविधांबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात यावे.
मतदान केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी, सावली, शौचालय यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात. शक्य त्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करावी. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला आणि तान्ह्या बाळांसह येणाऱ्या महिलांना मतदानात प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प, व्हिलचेअर यांसारख्या सोयी अनिवार्य करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच अन्य कोणत्याही माध्यमांतून निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे प्रचार समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांच्या जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन किंवा परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
निवडणूक प्रचार, माध्यम संनियंत्रण आणि जाहिरात प्रमाणनासंबंधी सविस्तर नियम राज्य निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

