(मुंबई)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण मोहिमेला वेग आला आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी २५ लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.
दरम्यान, स्मार्ट कार्ड वितरणात कोणताही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधित केंद्रांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्था अधिक आधुनिक व्हावी, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे.
त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहेत.

