(मुंबई)
मुंबईत अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (ANC) वरळी युनिटने चेंबूर परिसरात धडक कारवाई करत तब्बल 3.88 कोटी रुपये किमतीचे चरस जप्त केले आहे. या प्रकरणी एका संशयित ड्रग्स तस्कराला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून 3 किलो 886 ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ANC ची सापळा कारवाई
अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबईत ड्रग्सची खरेदी-विक्री आणि पुरवठा करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने नजर ठेवून होते. याचदरम्यान, चेंबूरमधील टिळक नगर परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांसह येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ANC चे पथक तत्काळ टिळक नगर परिसरात दाखल झाले आणि संशयित हालचालींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली.
बॅगेत सापडले 3 किलोपेक्षा अधिक चरस
तपासादरम्यान, टिळक नगर येथील ‘रेल व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’च्या प्रवेशद्वारासमोर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळली. स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची आणि त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली. या झडतीमध्ये आरोपीकडून 3 किलो 886 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 3 कोटी 88 लाख 60 हजार रुपये इतकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कारवाईनंतर आरोपीविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 8(c) आणि 20(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
मुंबईत ड्रग्स नेटवर्कचा तपास सुरू
इतक्या मोठ्या प्रमाणात चरस मुंबईत कसे आणले गेले? यामागील सप्लाय नेटवर्क कोणते आहे? आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा शोध घेण्यासाठी ANC कडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग्स तस्करीविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

