(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यातील कोथरूड परिसरात WhatsApp Statusवर फोटो ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा धक्कादायक शेवट झाला. १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. १९) पहाटे एआरएआय टेकडीवरील जंगल परिसरात घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरूड) असे मृत मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नील नाईक आणि ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही अल्पवयीन मुलगे एकमेकांच्या परिचयाचे असून ते एकाच वस्तीत राहत होते. काही दिवसांपूर्वी आरोपींपैकी एका मुलाला काही तरुणांनी मारहाण केली होती. या प्रकरणातील संबंधित तरुण सध्या कारागृहात आहेत. नीलची या तरुणांशी ओळख होती आणि त्याने त्यांचे फोटो आपल्या WhatsApp Statusवर ठेवले होते. याच कारणावरून आरोपी आणि नील यांच्यात वाद निर्माण झाला होता.
मंगळवारी (दि. १८) नील आणि दोन्ही अल्पवयीन आरोपी एकाच दुचाकीवरून राजगड परिसरातील एका शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते पहाटे पुण्यात परतले. परतल्यानंतर तिघे एआरएआय टेकडीवर गेले. याच ठिकाणी पुन्हा त्यांच्यात वाद झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एआरएआय टेकडीवरील जंगल परिसरात दोन्ही आरोपींनी नीलच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या नीलचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले.
दरम्यान, बुधवारी सकाळी एआरएआय टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना जंगल परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी याबाबत कोथरूड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता युवकाच्या डोक्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळून आल्या.
मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. नीलच्या मोबाइल फोनच्या आधारे त्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या परिचितांची चौकशी सुरू केली असता दोन्ही अल्पवयीन मुलांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले. चौकशीत त्यांनी नीलची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मारहाण करून कारागृहात गेलेल्या तरुणांचे फोटो नीलने WhatsApp Statusवर ठेवल्यामुळे आरोपी त्याच्यावर नाराज होते. ‘आपण एकाच वस्तीत राहतो, तरीही आमच्याशी संबंधित मुलांचे फोटो Statusला का ठेवतोस?’ यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर तिघांमध्ये समेट झाल्याचे भासवत ते एकत्र फिरण्यासाठी गेले आणि पुढे एआरएआय टेकडीवर गेल्यानंतर नीलवर हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या घटनेमुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया बाल न्याय व्यवस्थेनुसार केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

