(जळगाव / वृत्तसंस्था)
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी एक थरारक अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर आगाराची छत्रपती संभाजीनगर ते सुरत मार्गावर धावणारी एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला जाऊन दरीच्या टोकावर अडकली. बस दरीच्या काठावर धोकादायक स्थितीत लटकल्याने काही क्षणांसाठी प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडाला. मात्र, बस दरीत कोसळण्यापूर्वीच थांबल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघातग्रस्त एसटी बसचा क्रमांक MH 40 N 9726 असून, या बसमधून एकूण 49 प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर जाऊन धडकल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. बस दरीच्या अगदी टोकावर अडकल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखत मिळेल त्या मार्गाने बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी खिडक्यांमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला.
अपघातानंतर बसची अवस्था पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनाही धक्का बसला. रस्ता आणि खोल दरीच्या मध्ये बस धोकादायकरीत्या अडकलेली दिसत होती. काही क्षणांचा विलंब झाला असता बस दरीत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांसह स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या दृश्यांमध्ये एसटी बस दरीच्या काठावर अडकलेली दिसत असून, अपघाताची भीषणता त्यातून स्पष्ट होत आहे. 49 प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेल्या या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, बस नेमकी कोणत्या कारणामुळे दरीच्या काठावर गेली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ब्रेकमध्ये काही बिघाड झाला होता की चालकाचे नियंत्रण सुटले, याचा तपास करण्यात येत आहे. बस चालकाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान अचानक स्टेअरिंगमध्ये बिघाड जाणवला. त्यानंतर त्यांनी ब्रेक दाबून बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि बस थांबवली.
“गाडीचे स्टेअरिंग अचानक फ्री झाले. त्यानंतर मी ब्रेक दाबून गाडी कंट्रोल केली आणि थांबवली. अचानक स्टेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने नेमके काय झाले हे काही क्षण समजले नाही. मात्र, कशीतरी ब्रेक दाबून गाडी नियंत्रणात आणली आणि गाडी वाचवली,” अशी प्रतिक्रिया बस चालकाने दिली.
या घटनेनंतर अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, एसटी बसची तांत्रिक तपासणीही केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दरीच्या काठावर जाऊन अडकलेल्या बसमधून 49 प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

