(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यभरात तब्बल ११ हजार ५८७ शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाणार आहे. शेतकरी मित्रांना दररोज दोन तास काम करावे लागणार असून त्यासाठी दरमहा १ हजार ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे.
शेतकरी मित्राची भूमिका केवळ योजनांची माहिती देण्यापुरती मर्यादित राहणार नसून गावातील शेतकऱ्यांना संघटित करून शेतीविषयक उपक्रमांना चालना देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल. शेतकरी मित्राने गावात शेतकरी सुविधा केंद्र सुरू करणे अपेक्षित आहे. ‘आत्मा’ योजनेअंतर्गत गावात महिला किंवा पुरुष शेती गट, पीकनिहाय शेतकरी गट तसेच महिला अन्न सुरक्षा गट तयार करून त्यांच्या क्षमता बांधणीसाठी मदत करावी लागणार आहे.
शेतीशाळेसाठी शेतकऱ्यांची निवड करणे, कार्यशाळांच्या आयोजनासाठी मदत करणे आणि कार्यशाळांना उपस्थित राहणे, तसेच ग्रामसभेत गावकऱ्यांना विविध कृषी योजनांची माहिती देणे, ही कामेही शेतकरी मित्रांना करावी लागणार आहेत. ‘आत्मा’कडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या नोंदी ठेवणे, गावातील शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन व नियोजन करणे आणि त्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, अशी जबाबदारीही त्यांच्यावर असेल.
एकूण शेतकरी मित्रांच्या पदांपैकी ३० टक्के पदे महिलांसाठी लॉटरी पद्धतीने राखीव ठेवण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयातील ग्राम कृषी विकास समिती केंद्राकडे सादर करायचे आहेत. उमेदवारांमध्ये जास्त शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे.
शेतकरी मित्रांची बैठक प्रत्येक तीन महिन्यांनी आयोजित केली जाणार असून त्यांच्या कामाचे एक वर्षानंतर मूल्यमापन केले जाईल. गैरवर्तणूक किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित शेतकरी मित्रावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात आले आहे.
या पदासाठी उमेदवार अनुभवसंपन्न आणि प्रयोगशील शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असावे. उमेदवाराचे वय २५ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. संबंधित व्यक्ती गावातील रहिवासी असावी आणि तिच्याकडे स्वतःची शेती असणे आवश्यक आहे. उमेदवाराविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसावा. तसेच किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून सोशल मीडिया हाताळण्याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे.
शेतकरी मित्राला दिवसातून दोन तास काम करावे लागणार आहे. नियुक्तीचा कालावधी दोन वर्षांचा असेल आणि त्यानंतर त्याच उमेदवाराला पुन्हा संधी मिळणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी मित्रांना नियुक्तीपूर्वी बंधपत्रही द्यावे लागणार आहे. या बंधपत्रानुसार, उमेदवार स्वयंप्रेरणेने काम करण्यास तयार असल्याचे मान्य करेल. मानधनाव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त प्रवास भत्ता किंवा इतर देयके मिळणार नाहीत, याची उमेदवाराला जाणीव असल्याचे बंधपत्रात नमूद करावे लागेल. वरिष्ठांच्या सूचनेनुसार बैठकीस अनुपस्थित राहिल्यास किंवा अन्य कारणांमुळे सेवा खंडित झाल्यास त्याबाबत कोणताही आक्षेप राहणार नाही, तसेच सेवा नियमित करण्याचा दावा करणार नसल्याचेही मान्य करावे लागणार आहे.
या नियुक्तीमुळे गावपातळीवर शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती, प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांशी जोडण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या आणि गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची क्षमता असलेल्या इच्छुकांसाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे.

