(मुंबई)
भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यात ही अत्याधुनिक ट्रेन सेवेत दाखल होणार असून, लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या ट्रेनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे RAC आणि वेटिंग लिस्ट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना केवळ कन्फर्म तिकीटच मिळणार असून, अर्ध्या बर्थवर प्रवास करण्याची अडचण राहणार नाही.
ही वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरुवातीला हावडा–गुवाहाटी या मार्गावर धावणार आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममधील अनेक जिल्ह्यांतून ही ट्रेन प्रवास करणार असून, ईशान्य भारतासाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील. त्यात 11 थ्री एसी, 4 टू एसी आणि 1 फर्स्ट एसी डब्यांचा समावेश आहे. ही ट्रेन ईशान्य भारताला पूर्व भारताशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. ही रात्रीची ट्रेन १४ तासांत ९६८ किमी अंतर कापेल. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकात्यातील हावडा जंक्शन आणि गुवाहाटीतील कामाख्या जंक्शन दरम्यान धावेल.
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना निश्चित बर्थ, अधिक आराम आणि शिस्तबद्ध तिकीट प्रणाली देण्यासाठी भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये सर्वसामान्यांच्या सोयीकडे विशेष लक्ष दिले जाईल. या ट्रेनमध्ये कोणताही व्हीआयपी किंवा आपत्कालीन कोटा नसेल. या ट्रेनमध्ये रेल्वेच्या वरिष्ठ आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांचे प्रवास पास वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना फक्त पुष्टीकृत तिकिटे दिली जातील. प्रतीक्षा यादी आणि आरएसी तिकिटांना परवानगी दिली जाणार नाही.
किमान भाडे रचना
या ट्रेनसाठी किमान 400 किमीचे भाडे आकारले जाणार आहे, प्रवासाचे अंतर कमी असले तरीही (GST वेगळा):
- 3AC: ₹960
- 2AC: ₹1240
- 1AC: ₹1520
- लांब पल्ल्याचे भाडे
1000 किमी: 3AC ₹2400 | 2AC ₹3100 | 1AC ₹3800 - 2000 किमी: 3AC ₹4800 | 2AC ₹6200 | 1AC ₹7600
- 3000 किमी: 3AC ₹7200 | 2AC ₹9300 | 1AC ₹11400
वेग, वेळ आणि सुरक्षा
वंदे भारत स्लीपर ट्रेनची कमाल क्षमता 180 किमी प्रतितास असली तरी सुरक्षिततेसाठी ती 130 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. ही ट्रेन सध्याच्या राजधानी एक्सप्रेसपेक्षा सुमारे 3 तास कमी वेळेत प्रवास पूर्ण करेल.
सुरक्षेसाठी ‘कवच’ प्रणाली, ऑटोमॅटिक दरवाजे, आधुनिक सस्पेंशन, इमर्जन्सी टॉक-बॅक सुविधा देण्यात आली आहे. रात्री प्रवास करून सकाळी गंतव्यस्थानी पोहोचण्याची सोय, आरामदायी कुशन बर्थ आणि कमी आवाज यामुळे ही ट्रेन लक्झरी रेल्वे प्रवासाचा नवा अनुभव देणार आहे.
राजधानीपेक्षा भाडे किंचित जास्त असले तरी वेग, आराम आणि कन्फर्म सीटची हमी यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांसाठी नवा मापदंड ठरणार आहे.

