(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्यानंतर बँक खात्यात होल्ड केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘एमआरएम’ (Money Reconciliation Module) हे नवे मॉड्यूल तयार केले आहे. या माध्यमातून सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांना त्यांच्या तक्रारीशी संबंधित होल्ड केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मात्र, यासाठी सर्वप्रथम १९३० या राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइनवर फसवणुकीची तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.
सायबर फसवणुकीनंतर तक्रारदाराकडे १९३० हेल्पलाइनवर केलेल्या तक्रारीचा किंवा तक्रार नोंदवल्यानंतर मिळालेला १४ अंकी क्रमांक असणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘एमआरएम’च्या माध्यमातून होल्ड केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी तक्रारदाराने एमआरएम पोर्टल वर जाऊन आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावर प्राप्त झालेला ओटीपी टाकून लॉगिन करावे. त्यानंतर पॅनकार्ड, बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड यांसारखी आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा.
अर्ज सादर केल्यानंतर तक्रारदाराला एक युनिक रिक्वेस्ट क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या माध्यमातून अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन तपासता येणार आहे. तक्रारदाराने केलेल्या अर्जानंतर संबंधित बँक खात्यात उपलब्ध असलेली आणि होल्ड केलेली रक्कम परत करता येण्यास पात्र आहे का, याची पडताळणी केली जाईल. त्याबाबतची माहिती तक्रारदाराला मेसेजद्वारे देण्यात येणार आहे.
‘एमआरएम’वर अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित बँकेला ३० दिवसांच्या आत निर्णय घेण्याची प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले आहे. सायबर पोलिसांकडून आवश्यक पडताळणी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात परत जमा केली जाऊ शकते.
दरम्यान, ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या प्रकरणांमध्ये एफआयआर किंवा न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नसल्याचे या प्रक्रियेबाबत सांगण्यात आले आहे. मात्र, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास न्यायालयाच्या आदेशाची प्रत आवश्यक ठरू शकते. न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर तपास अधिकारी संबंधित बँकेला आवश्यक माहिती देऊन होल्ड केलेली रक्कम तक्रारदाराला परत करण्यासाठी प्रक्रिया पुढे नेऊ शकतो.
या प्रक्रियेत तक्रारदाराला ५०० रुपयांचा बाँड पोलिसांकडे सादर करावा लागतो. हा बाँड संबंधित बँकेसाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पोलिस भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम १०६(३)नुसार संबंधित बँकेला पत्र देऊन होल्ड केलेली रक्कम पात्र खातेदाराला परत करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. बँकेकडून आवश्यक पडताळणी झाल्यानंतर संबंधित रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा केली जाऊ शकते.
सायबर फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी वेळ न दवडता १९३० या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवणे महत्त्वाचे आहे. तक्रार जितक्या लवकर नोंदवली जाईल, तितक्या लवकर संबंधित व्यवहारावर कारवाई करून रक्कम होल्ड करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधण्याबरोबरच १९३० वर तक्रार नोंदवणे आणि मिळालेला तक्रार क्रमांक जपून ठेवणे महत्त्वाचे आहे.

