( मुंबई )
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ (Vessel Sealer) उपकरणे बसविण्यात आली असून, यामुळे शस्त्रक्रियांची गुणवत्ता आणि रुग्णांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या प्रकल्पासाठी इंडियन ऑइल कंपनीने CSR अंतर्गत सहकार्य केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांनाही आधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रकल्पांतर्गत जनरल सर्जरी विभागासाठी दोन प्रगत इलेक्ट्रोसर्जिकल युनिट्स ‘इलेक्टिव्ह सर्जरी ओटी’ जमशेदजी मेहता शस्त्रक्रिया कक्षात बसविण्यात आले आहेत.
रक्तस्त्राव नियंत्रणात मोठी मदत
केईएम रुग्णालय हे मुंबईतील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य संस्थांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होत असल्याने अत्याधुनिक उपकरणांची गरज मोठ्या प्रमाणात होती. नव्याने बसविण्यात आलेली ‘Vessel Sealer’ उपकरणे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तवाहिन्या सील करून रक्तस्त्राव त्वरित थांबवण्यास मदत करतात. त्यामुळे शस्त्रक्रियांची अचूकता वाढणार असून गुंतागुंत आणि धोका कमी होण्यास मदत होईल. विशेषतः जटिल शस्त्रक्रियांमध्ये डॉक्टरांना अधिक कार्यक्षमतेने उपचार करता येणार आहेत.
गरीब रुग्णांना आधुनिक उपचारांचा लाभ
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणे ही सरकारची प्राथमिकता आहे. अशा उपक्रमांमुळे सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता वाढते आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतो.” या नव्या सुविधेमुळे केवळ शस्त्रक्रियांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार नाही, तर गरीब आणि वंचित घटकांसाठी आधुनिक वैद्यकीय सेवांचा मार्ग अधिक सुलभ होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

