(मुंबई / वृत्तसंस्था)
खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या गोण्यांखाली मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. रविशंकर नंदकिशोर गिरी (35) या बांधकाम मजुराची हत्या करून त्याचा मृतदेह बांधकाम साहित्याखाली लपवण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली असून, मयताचा 17 वर्षीय पुतणाच या हत्येमागे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाला खार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बांधकामाच्या ठिकाणी व्यक्ती सिमेंटच्या गोण्यांखाली बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच खार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृताची ओळख रविशंकर नंदकिशोर गिरी (35) अशी पटली. तो बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असून मुंबईत बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.
प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने रविशंकर यांचा खून करून मृतदेह बांधकाम साहित्याखाली लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर खार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान ही हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी 19 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
हत्येचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, उपलब्ध परिस्थितीजन्य पुरावे तसेच बांधकाम साईटवरील इतर मजुरांकडून मिळालेली माहिती तपासण्यात आली. याचदरम्यान मयताचा 17 वर्षीय पुतण्या स्वतः तक्रारदाराच्या भूमिकेत राहून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय तपास पथकाला आला.
आरोपीच्या बोलण्याची पद्धत, देहबोली, घटनाक्रमाबाबत त्याने दिलेली माहिती, त्याच्या हालचाली आणि जबाबातील विसंगती यांचे पोलिसांनी सूक्ष्म निरीक्षण केले. त्यानंतर त्याची शास्त्रीय आणि तांत्रिक पद्धतीने चौकशी करण्यात आली. घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, इतर मजुरांकडून मिळालेली माहिती आणि आरोपीच्या जबाबातील विसंगती यांची सांगड घातल्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला. पुढील तपासात मयताचा पुतण्या विशालकुमार रामलखन गिरी हाच या हत्येतील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हत्येमागे अनैतिक संबंधांचा वाद?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हत्येमागे अनैतिक संबंधांचा वाद असल्याचे समोर आले आहे. आरोपीचे काकीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असून, याच कारणातून त्याने आपल्या काकाची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या हत्येचे नेमके कारण आणि घटनेमागील सर्व बाबींचा तपास अद्याप सुरू आहे.
बांधकाम साईटवर मृतदेह सापडल्याने सुरुवातीला या प्रकरणात अज्ञात व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलत अवघ्या काही काळात मयताच्या पुतण्यापर्यंत तपास पोहोचवला. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे.

