(खोपोली)
मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात ‘अंडा पॉईंट’जवळ एका ट्रकमधून लोखंडी पाइप अचानक रस्त्यावर पडल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, एका लहान मुलासह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (१२ जुलै) सायंकाळी सुमारे ७.३० वाजता घडली.
खोपोलीहून लोणावळ्याकडे जात असलेल्या मोठ्या ट्रकमध्ये लोखंडी पाइप लादलेले होते. बोरघाटातील वळणावर ‘अंडा पॉईंट’जवळ ट्रकचे ब्रेक लागल्यानंतर अचानक त्यामधील सर्व पाइप रस्त्यावर पडले. हे पाइप मागून येणाऱ्या कार आणि दुचाकीवर आदळले, त्यामुळे अपघात अतिशय भीषण झाला. या दुर्घटनेत ऋतुजा चव्हाण (२६) आणि अंकिता शिंदे (२८) या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर वैभव गलांडे (२९), सोनाली खंडात्रे (३३), शिवराज खडत (०६), ललिता शिंदे (५०), आणि ललित शिंदे (३०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, हेल्प फाउंडेशन, महाराष्ट्र सुरक्षा दल, मृत्युंजय देवदूत टीम, आणि स्थानिक मॅकेनिक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. या प्रकरणाचा तपास खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.