(बीड / वृत्तसंस्था)
जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना तिच्यावर एकापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असून, गंभीर संसर्गामुळे गर्भाशय काढावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर महिलेचे सिझेरियन करण्यात आले. त्यानंतर तिला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी तिला बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर पोटात काहीतरी राहिल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. सोनोग्राफीमध्ये पोटात पू झाल्याचेही सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पीडित महिलेच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलीला उलट्या होत असल्याने तिला खासगी डॉक्टरांकडे दाखवण्यात आले. तपासणीनंतर इन्फेक्शन झाल्याचे सांगण्यात आले. पुढील तपासणीत पोटात काहीतरी राहिल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. मुलीची शस्त्रक्रिया कुठे झाली, अशी विचारणा केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे नाव सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला. कुटुंबीयांनी विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी प्रयत्न केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने अखेर महिलेला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांचा आरोप आहे की, उपचारासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे यांनी या प्रकरणावरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा रुग्णालयातून रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे पाठवून कथित ‘सिंडिकेट’ चालवले जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ससून रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेवर आतड्यांसह इतर अवयवांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे आणि गंभीर परिस्थितीत तिचे गर्भाशय काढावे लागल्याचे कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
‘माझी मुलगी पहिल्यांदाच आई झाली. मात्र, आज ती स्वतःच्या बाळाला हातात घेण्याच्या परिस्थितीत नाही. तिच्यावर ही वेळ आणणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी व्यथा पीडित महिलेच्या आईने व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय उपचारांच्या गुणवत्तेवर आणि रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे पाठवले जाते का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी आणि संबंधित डॉक्टरांची बाजू समोर आल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

