(मुंबई)
रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करत असताना एका महिलेनं चार्जिंग सॉकेटला इलेक्ट्रिक किटली लावून मॅगी तयार केली. आपल्या पतीसाठी गरमागरम मॅगी बनवताना ती आनंदाने शेजारील प्रवाशांशी बोलत असताना याबाबतचा व्हिडिओ बनवण्यास सांगितला. पण रेल्वे डब्यात केलेला हा जुगाड तिच्यावरच भारी पडला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं तिच्यावर तात्काळ कारवाई केली आहे.
घटनेचा व्हिडिओ @Central_Railway या अधिकृत X अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये महिला इलेक्ट्रिक किटली वापरून मॅगी शिजवत असल्याचे स्पष्ट दिसते. ती विनोदाने म्हणते, “इथेही मला सुट्टी नाही. साहेबांसाठी जेवण करावंच लागतं.”
नियमांचं उल्लंघन आणि धोकादायकही
रेल्वेच्या नियमांनुसार प्रवाशांना ट्रेनमध्ये कोणताही पदार्थ तयार करण्यास सक्त मनाई आहे. इलेक्ट्रिक किटली, इलेक्ट्रिक शेगडी किंवा अन्य हीटिंग उपकरणे वापरणे ही सुरक्षा भंगाची (Safety Violation) गंभीर बाब मानली जाते.
ट्रेनमधील चार्जिंग सॉकेट्स हे फक्त मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या मर्यादित उपकरणांसाठी असतात. त्यावर जादा भार पडल्यास पूर्ण रेल्वेचे सॉकेट बिघडू शकते, शॉर्ट सर्किट होऊ शकते किंवा आगही लागू शकते. त्यामुळे संपूर्ण कोचमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
महिलेवर कायदेशीर कारवाई
ही कृती रेल्वे नियमांचे उल्लंघन असल्याने तिच्यावर कलम 147(1) अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं की, “ट्रेनमध्ये प्रवाश्यांनी अन्न बनवणे हे असुरक्षित, बेकायदेशीर आणि दंडनीय आहे. अशा कृतींची पुनरावृत्ती करू नये.” सोशल मीडियावर काहींनी या जुगाडाचे कौतुक केले असले तरी बहुसंख्यांनी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल महिला आणि तिच्या पतीवर टीका केली आहे.

