( रत्नागिरी / वार्ताहर )
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गणपतीपुळे आणि गोवा या दोन प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारी गणपतीपुळे-पणजी थेट बससेवा १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. गोवा राज्य परिवहन महामंडळाच्या (कदंबा) माध्यमातून ही बससेवा सुरू करण्यात आली असून, त्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
रत्नागिरी परिसरातून पणजीला जाण्यासाठी यापूर्वी थेट आणि पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बस बदलण्याचा त्रास सहन करावा लागत होता. नव्या थेट बससेवेमुळे हा प्रवास अधिक सुलभ होणार असून, कोकण आणि गोवा यांच्यातील प्रवासी वाहतुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या भागातील प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. गणपतीपुळे आणि गोवा ही दोन्ही लोकप्रिय पर्यटनस्थळे थेट बससेवेने जोडली गेल्याने कोकणातील पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.
बसचा मार्ग
कदंबा महामंडळाची बस गणपतीपुळे येथून सुटून गणपतीपुळे – रत्नागिरी – पावस – आडिवरे – धारतळे – राजापूर – कणकवली – कुडाळ – सावंतवाडी – म्हापसा – पणजी या मार्गाने धावणार आहे.
गणपतीपुळे ते पणजी वेळापत्रक
- गणपतीपुळे : सकाळी ७.१५
- रत्नागिरी : सकाळी ८.३०
- पावस : सकाळी ९.००
- आडिवरे : सकाळी ९.४०
- धारतळे : सकाळी ९.५०
- राजापूर : सकाळी १०.३०
पणजी ते गणपतीपुळे
- पणजी बसस्थानक : दुपारी १.१५
या नव्या बससेवेचा रत्नागिरी, राजापूर तसेच संपूर्ण कोकणातील प्रवाशांनी आणि पर्यटकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन गोवा राज्य परिवहन महामंडळाच्या (कदंबा) वतीने करण्यात आले आहे. नव्या सेवेमुळे कोकण-गोवा प्रवास अधिक सोयीचा होण्याबरोबरच दोन्ही भागांतील पर्यटन आणि प्रवासी संपर्काला बळ मिळणार आहे.

