(मुंबई)
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर, तर शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. महायुतीने निवडणुकांत “पैशांचा वारेमाप वापर” केल्याचा आरोप करत त्यांनी निकालांवर नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही निष्ठेने निवडणुका लढवल्या. महायुतीने पैशांचा महापूर आणला, मात्र निष्ठेची भिंत पाडू शकली नाही. कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांनी “उद्याचा काळ आपलाच असेल” असा विश्वास व्यक्त केला. अपेक्षित यश न मिळाल्यानंतरही संघटनात्मक बळ आणि निष्ठावंत मतदार हेच पक्षाचे खरे भांडवल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, ठाकरेंच्या आरोपांवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पलटवार केला. “निवडणूक हरल्यानंतर मनाला समाधान देण्यासाठी अशा प्रकारची विधानं केली जातात,” असा टोला त्यांनी लगावला. महायुतीच्या विजयाचे श्रेय त्यांनी सरकारच्या कामगिरीला आणि स्थानिक पातळीवरील संघटनशक्तीला दिले.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकांची मालिका सुरू असून, नगर परिषद, नगरपंचायत, महापालिका तसेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भाजप व मित्रपक्षांनी सातत्याने चांगली कामगिरी केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महायुतीचा राजकीय प्रभाव अधिक मजबूत होत असल्याची चर्चा सुरू आहे.
ZP Election Result 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हे निकाल महत्त्वाचे मानले जात असून, महायुतीची आघाडी कायम राहणार की विरोधक नव्या रणनीतीसह पुनरागमन करणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

