(मुंबई / भिवंडी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2026) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून पुढे ढकलण्यात आल्यानंतर या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याचा कट रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती भिवंडीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण हरियाणाचा तर दोन जण बिहारचे रहिवासी आहेत. हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. प्राथमिक तपासात त्यांनी टीईटीची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणल्याचे समोर आले असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच भिवंडी पोलिसांनी कोनगाव परिसरात कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून प्रश्नपत्रिकेशी संबंधित कागदपत्रे आणि महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळाली, ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि ती कोणाला विकली जाणार होती, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जून रोजी राज्यातील ३७ शहरांमधील १,०२८ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा आयोजित केली होती. मात्र भिवंडी पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, आरोपींकडील मजकूर आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न समान असल्याचे आढळले. त्यानंतर परीक्षेची पारदर्शकता कायम राखण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी २० पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून, विविध राज्यांमध्ये तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, प्रश्नपत्रिका आणखी कुणाकडे पोहोचली आहे का, किती उमेदवारांपर्यंत ती पोहोचली आणि या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
याशिवाय आरोपींचे कोचिंग क्लासेस, परीक्षा एजंट किंवा इतर पेपरफुटी रॅकेटशी संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर अवघ्या काही दिवसांत टीईटी परीक्षेतही गैरप्रकार समोर आल्याने राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

