( पाली / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील खानू केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कशेळी कोंड या दुर्गम भाग असलेल्या शाळेतील विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या शाळेची विद्यार्थिनी स्वरा अजित बावकर हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २२२ गुण मिळवत रत्नागिरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत १०० वे, तर तालुक्यात १७ वे स्थान पटकावले आहे.
इयत्ता चौथीच्या स्तरावरील अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना स्वराने सुरुवातीपासूनच अभ्यासात सातत्य आणि चिकाटी ठेवली. नियमित अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तिने हे यश संपादन केले. दुर्गम भागातील शाळेत शिक्षण घेत असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
स्वराच्या यशामध्ये तिचे आई-वडील अंकिता बावकर आणि अजित बावकर यांचा खंबीर पाठिंबा महत्त्वाचा ठरला. शैक्षणिक वाटचालीत मुलीला सातत्याने प्रोत्साहन देत त्यांनी तिच्या अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच पालकांच्या प्रोत्साहनामुळे स्वराने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल कामगिरी केली.
तिच्या या यशासाठी केंद्रप्रमुख विष्णू पवार, गोविंद तारवे, माजी मुख्याध्यापक राजाराम खाकम, मुख्याध्यापिका व मार्गदर्शिका माधुरी शिंदे-पाटील तसेच सहाय्यक शिक्षक अमोल काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी परीक्षेची तयारी करून घेताना स्वराच्या अभ्यासातील प्रगतीकडे विशेष लक्ष दिले.
स्वराने मिळवलेल्या यशाबद्दल तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सायली ताम्हणकर, माजी सरपंच दीपक बावकर, पोषण आहार कर्मचारी प्रकाश बावकर, शिक्षणतज्ज्ञ अनंत ताम्हणकर, अनिल ताम्हणकर, अशोक ताम्हणकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे ही शाळेसाठी तसेच गावासाठी अभिमानाची बाब आहे. स्वराच्या या यशामुळे परिसरातील अन्य विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती परीक्षेसह विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी प्रेरणा मिळाली आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

