(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद मिरवणे येथील श्री महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला “कोकण भूषण पतसंस्था पुरस्कार २०२५” हा सन्मानाचा पुरस्कार अलिबाग येथे मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेत हा बहुमान वाटद मिरवणे श्री महालक्ष्मी पतसंस्थेने पटकावला आहे.
वाटद खंडाळा परिसरामध्ये १९८० – ८५ मध्ये कोणत्याही सुविधा नव्हत्या. रस्ते, लाईट, बँका, पतसंस्था, दालन वळणाची साधने अशा प्रकारच्या सोई त्यावेळी नव्हत्या. त्यावेळी गावातील रेल्वेतून सेवा निवृत्त झालेले मिरवणे येथील दादासाहेब शिर्के, विष्णुदत्त निमकर, रंजना शिर्के यांच्या संकल्पनेतून महिलांना एकत्र करून हळदी कुंकूचे कार्यक्रम घेतले. त्यातून महिला मंडळे स्थापन केली. त्यावेळी गावामध्ये बँका नव्हत्या. सर्वांचे व्यवहार मनीओर्डर वर अवलंबून असायचे, त्यामुळे महिनाभरात लागणारी वस्तू अथवा पैसे सावकार किंवा दुकानदार यांच्याकडून उसने घ्यावे लागत.
कालांतराने उसनवारी वाढत जायची. महिलांना बचतीची सवय लागणे आवश्यक आहे असा विचार होऊ लागला. म्हणून मासिक ५ रुपये जमा करायचे ठरले. व ती जमा झालेली रक्कम १० की.मी. चालत जाऊन सैतवडे गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे बचत करण्याचे ठरले. म्हणून महिला मंडळातून जमा झालेली रक्कम वाटून घ्यायचे ठरले. परंतु बँक ऑफ इंडियात काम करणारे विष्णुदत्त निमकर यांनी सर्व महिलांना विश्वासात घेऊन आपली महिला पतसंस्था स्थापन करण्याचा विचार सर्वांसमोर ठेवला. पतसंस्थेची संकल्पना ही ज्या वेळी सहकार क्षेत्रातील अभ्यास सहल ग्रामविकास संस्थेने आयोजित केली, त्यानंतर नक्की झाली. या साठी ग्रामविकास संस्थेने निवडक महिलांना घेऊन, हातकणंगले, हुपरी, गोकुळ प्रकल्प, वारणा प्रकल्प येथे भेटी दिल्या, व हुपरी येथील महिलांची संस्था पाहून विश्वास वाढला.
संवाद संस्थेच्या सुधाताई कोठारी, तसेच स्पार्क संस्थेच्या प्रेमा गोपालन यांनी या अभ्यास सहली साठी सहकार्य केले, त्या चर्चेतून श्री निमकर यांनी ही संकल्पना मांडली व त्याला श्री दादा शिर्के यांनी चांगल्या प्रकारे साथ दिली. त्या वेळी सभासद करण्यासाठी व निधी गोळा करण्यासाठी रंजना शिर्के, संध्या चाळके, सुलभा बाचरे वगैरे मिरवणे येथील व शुभांगी दुर्गवली यांनी परिसरातील गावामध्ये जाऊन सभासद गोळा केले. त्याला दादासाहेब शिर्के व सर्व महिलांनी सहमती दर्शवली व जमा झालेली रक्कम रुपये १९०००/- हि भाग भांडवल म्हणून वापरण्याचा निर्णय झाला. त्यावेळी १९८५ मध्ये ग्रामविकास मंडळ वाटद मिरवणे या ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९२- ९३ मध्ये श्री. महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली.
सदर पतसंस्थेची मान्यता घेताना अनेक अडचणी आल्या. परंतु निमकर साहेबांच्या प्रयत्नांनी परिसरातील महिलांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यावेळचे सहकार मंत्री शिवाजीराव देशमुख यांना विनंती करून महिलांसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवली. तेव्हापासून सुरु झालेल्या पतसंस्थेत परिसरातील १२ गावातील महिलांना सभासदत्व देण्यात आले. आज रोजी २४५२ महिला सभासद असून ५ कोटी पेक्षा जास्त व्यवसाय महिलांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामविकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. ग्रामीण भागात असूनही महिलांचा विश्वास या पतसंस्थेवर आहे.
पतसंस्थेला डोंबिवली नागरी सहकारी पतसंस्थेने सन २०१६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यानंतर आता विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्या. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या स्पर्धेत श्री. महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५ हा पुरस्कार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी अलिबाग येथे मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल श्री. महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेवर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थापक श्री. विष्णुदत्त निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. आर्थिक व्यवसाय सांभाळताना गरजू व सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा केला जातो. व ठेवींवर योग्य व्याजदर दिला जात आहे. त्यामुळे पतसंस्थेची अखंडितपणे यशस्वी वाटचाल सुरु आहे. संस्थेने आर्थिक पारदर्शकता सांभाळत सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. त्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे संस्थेची जबाबदारी आणखी वाढली आहे. अध्यक्ष श्रीमती. नम्रता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी वर्ग, पिग्मी प्रतिनिधी, सभासद, हितचिंतक यांच्या सहकार्याने हि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.