(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व सहा उमेदवारांची एकूण १२ नामनिर्देशनपत्रे छाननीअंती वैध ठरली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना अधिक वेग आला असून, आता ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र दळवी यांनी ३० मे रोजी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सुरेंद्रनाथ यशवंत माने यांनी चार, अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी एक, मानसी संतोष म्हात्रे यांनी एक, अनिल रमेश चोपडा यांनी एक आणि अनिकेत सुनील तटकरे यांनी चार नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. अशा प्रकारे एकूण सहा उमेदवारांची १२ नामनिर्देशनपत्रे निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.
छाननी प्रक्रियेदरम्यान सर्व अर्जांची सविस्तर तपासणी करण्यात आली. तसेच उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधींना अर्जांबाबत कोणताही आक्षेप असल्यास तो नोंदविण्याची संधीही देण्यात आली. मात्र कोणताही आक्षेप नोंदविला गेला नसल्याने सर्व नामनिर्देशनपत्रे वैध घोषित करण्यात आली. दरम्यान, मानसी संतोष म्हात्रे यांचे नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात आल्याची नोंदही निवडणूक प्रशासनाने केली.
माघारीनंतरच चित्र होणार स्पष्ट
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून असून, त्या दिवशी कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतात, यावर अंतिम लढतीचे चित्र अवलंबून असेल. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे लक्ष आता उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, आगामी काही दिवसांत उमेदवारांच्या हालचाली आणि राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

