(रत्नागिरी /प्रतिनिधी)
हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील महामार्गावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालवून वाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. ३ ऑक्टोबर रोजी रात्री काही मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या दोन्ही घटनांप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना रात्री ८.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. गौरव सुभाष पाचकुडे (वय २४, मूळ रा. करबुडे, मावळती पाचकुडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा होंडा कंपनीची डीओ दुचाकी (एमएच-०८/एयू-१२७२) घेऊन हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या महामार्गावर रत्नागिरीकडून हातखंब्याच्या दिशेने विरुद्ध बाजूने वाहन चालवताना आढळून आला. त्याच्या या पद्धतीच्या वाहनचालकामुळे रस्त्यावरील इतर वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा तसेच अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी प्रविण कल्लापा पाटील यांनी फिर्याद दिली.
दुसरी घटना त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी, रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास घडली. ओंकार अनिल आपकरे (वय २१, मूळ रा. पानवल, आपकरेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा होंडा डीओ दुचाकी (एमएच-०८/एआर-४८८९) घेऊन त्याच महामार्गावर रत्नागिरीकडून हातखंब्याच्या दिशेने विरुद्ध बाजूने वाहन चालवताना आढळून आला. या प्रकारामुळे महामार्गावरील इतर वाहनांना अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार विकास भगवान चव्हाण यांनी फिर्याद दिली. दोन्ही प्रकरणांत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१ अन्वये गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.


