(रत्नागिरी / प्रतिनिधी)
चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील लांजा, चिपळूण आणि संगमेश्वर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवाया करत तिघांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवायांमधून स्पष्ट झाले आहे.
लांजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.५० वाजण्याच्या सुमारास लांजा बाजारपेठेतील कोत्रे हॉटेलजवळ, मुंबई-गोवा महामार्गालगत गोंडेसखल रोड परिसरात अनंत राजाराम रेवाळे (वय ३५, रा. गवाणे, ता. लांजा) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. तो लांजा पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत संशयास्पदरीत्या भटकत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम १२२(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई नितेश नवनाथ राणे यांनी फिर्याद दिली.
चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशीच कारवाई करण्यात आली. ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते येथील मराठी शाळेजवळ अर्जनकुमार बाल्मिकी सहा (वय २७, व्यवसाय मजुरी, रा. पंडीतपूर, जि. गोपाळगंज, बिहार) हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला. चोरीच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेत स्वतःचे अस्तित्व लपवून तो परिसरात उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्याच्या हालचालींबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १२२(क) अन्वये कारवाई केली. याप्रकरणी पोलिस शिपाई राकेश मनोहर चव्हाण यांनी फिर्याद दिली.
संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संगमेश्वर-देवरुख मार्गालगत हनुमान मंदिराच्या मागील बाजूस मनोजकुमार रामप्रकाश (वय ३२, मूळ रा. रुदलापूर गाव, पोस्ट बस्ती, जि. सिद्धार्थनगर; सध्या रा. शास्त्रीपूल, अब्दुल खान यांच्या भंगार दुकानात, ता. संगमेश्वर) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. चोरी करण्याच्या उद्देशाने सूर्यास्तापासून सूर्योदयापूर्वीच्या कालावधीत तो मंदिराच्या आडोशाला फिरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई संकेत सोपान आटोळे यांनी फिर्याद दिली असून, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून, अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी गस्त आणि तपासणीची कार्यवाही सुरू असल्याचे या कारवायांमधून दिसून येत आहे.


