(रत्नागिरी / वार्ताहर)
उक्षी रेल्वे स्थानकावर ‘दिवा-सावंतवाडी’ आणि ‘सावंतवाडी-दिवा’ या दोन्ही गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता संघटनात्मक बळ मिळाले आहे. या मागणीसाठी ‘उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’च्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, रेल्वे थांब्याचा प्रश्न अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने लावून धरण्याचा निर्धार समितीने केला आहे.
उक्षी पंचक्रोशीतील सुमारे २० ते २५ गावांतील नागरिकांसाठी उक्षी रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे. उक्षीसह परचुरी, वांद्री, करबुडे, बावनदी, कोळंबे, आंबेड, सोनगिरी, मानसकोंड, कुरधुंडा, चाफे, ओरी, जाकादेवी, पोचरी, देण, खालगाव, फुणगूस, डिंगणी, रानपाट, लाजुल, सप्तलिंगी, नरबे, कोंडये, पीरंदवणे, उजगाव, नांदळज, कोसुंब, ताम्हाणे, आंबवली आदी गावांतील नागरिक प्रवासासाठी या स्थानकावर अवलंबून आहेत.
पूर्वी उक्षी स्थानकावर ‘दिवा-सावंतवाडी’ आणि ‘सावंतवाडी-दिवा’ या दोन्ही गाड्यांना थांबा होता. मात्र, कोरोना महामारीनंतर रेल्वे सेवा पूर्वपदावर आल्यानंतर या गाड्यांचे उक्षी स्थानकावरील थांबे बंद करण्यात आले. त्यामुळे पंचक्रोशीतील नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या दोन्ही गाड्यांना पुन्हा उक्षी येथे थांबा मिळावा, यासाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन, कोकण रेल्वे तसेच संबंधित लोकप्रतिनिधींकडे संघटितपणे पाठपुरावा करण्यासाठी संघर्ष समितीच्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. मुझम्मील काझी यांची अध्यक्षपदी, हरिश्चंद्र बंडबे आणि प्रदीप चंदरकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रमेश मेस्त्री यांच्याकडे सचिवपद, अब्दुल मुनाफ खतिब यांच्याकडे सहसचिवपद, तर अविनाश कळंबटे यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
समितीच्या संघटकपदी वसंत मेस्त्री आणि चंद्रकांत वेद्रे, कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. अरुण नागवेकर, तर सल्लागार म्हणून अनंत कळंबटे आणि गोविंद कळंबटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद जाधव आणि सुरेश कळंबटे यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोअर कमिटीच्या सदस्यांमध्ये सत्यवान वेद्रे, रवींद्र जाधव, उदय बेनकर, नंदकुमार कुवार, गजानन पानगले, पांडुरंग पाताडे, जगन्नाथ दुदम, संदीप सापटे, नितीन चंदरकर आणि प्रकाश शिगवण यांचा समावेश आहे.
उक्षी स्थानकावरील बंद झालेले रेल्वे थांबे पुन्हा सुरू होणे हा केवळ एका गावाचा प्रश्न नसून संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांना या रेल्वेसेवेचा मोठा फायदा होतो. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी रेल्वे प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
या मागणीसाठी पंचक्रोशीतील गावांमध्ये सह्यांची मोहीमही राबविण्यात येत आहे. नागरिकांचा वाढता सहभाग आणि जनसमर्थनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
उक्षी रेल्वे स्थानकाचा प्रश्न आता केवळ निवेदन आणि मागणीपुरता मर्यादित न राहता संघटित जनआंदोलनाच्या दिशेने पुढे सरकला आहे. ‘दिवा-सावंतवाडी’ आणि ‘सावंतवाडी-दिवा’ या दोन्ही गाड्यांना पुन्हा उक्षी येथे थांबा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार ‘उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’ने केला आहे.

