(रत्नागिरी)
तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनारी असलेल्या खडपात गुरुवारी सकाळी एक मानवी सांगाडा सापडल्याने परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. पूर्णगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन सांगाडा ताब्यात घेतला आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच तो पुरुषाचा आहे की स्त्रीचा हे स्पष्ट होणार आहे.
याबाबत गणेशगुळेचे पोलिस पाटील संतोष जनार्दन लाड यांनी पूर्णगड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ते गणेशगुळे समुद्रकिनारी असलेल्या खडपात गेले होते. त्यावेळी त्यांना त्याठिकाणी एक मानवी सांगाडा दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती देताच पूर्णगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तो सांगाडा ताब्यात घेतला. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
या सांगाड्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच तो सांगाडा स्त्रीचा की पुरुषाचा आहे, याची माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल ललित देऊसकर करत आहेत.