(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. आणि बी.एड. पात्रताधारक सुशिक्षित बेरोजगार शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन शिक्षक भरतीसह विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक पात्र उमेदवारांना प्राधान्य मिळावे, यासाठी शिक्षक भरती जिल्हासंवर्ग करण्यात यावी आणि किमान ८० टक्के भरती स्थानिक उमेदवारांमधून करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत डी.एड. व बी.एड. पात्रता असलेले मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार आहेत. शिक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असूनही स्थानिक उमेदवारांना रोजगाराच्या संधींसाठी इतर जिल्ह्यांकडे धाव घ्यावी लागत असल्याची भूमिका शिक्षक प्रतिनिधींनी मांडली. स्थानिक पातळीवर शिक्षकांची आवश्यकता असताना त्या पदांवर स्थानिक पात्र उमेदवारांना संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“आमची भरती, आमच्याच जिल्ह्यात करा,” अशी मागणी करत शिक्षक प्रतिनिधींनी शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांसाठी स्वतंत्र तरतूद करण्याची मागणी आमदार जठार यांच्याकडे केली. जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता आणि दुसरीकडे पात्रताधारक स्थानिक युवकांमध्ये बेरोजगारीची समस्या, या दोन्ही बाबींचा विचार करून शासनाने शिक्षक भरतीबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
स्थानिक उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातच रोजगाराची संधी मिळाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही होऊ शकतो. स्थानिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक गरजा यांची माहिती असलेल्या उमेदवारांना स्थानिक शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे शिक्षक प्रतिनिधींनी सांगितले.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी डी.एड. व बी.एड. पात्रताधारक शिक्षक प्रतिनिधींच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. त्यांच्या मागण्यांबाबत योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, संतोष साखरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, रुपेश कदम, प्रतीक देसाई, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन मोहिते यांच्यासह डी.एड. व बी.एड. शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

