(रत्नागिरी /प्रतिनिधी)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेची व्यापक शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. ‘मिशन सुधार’ अंतर्गत झालेल्या प्राथमिक पडताळणीत हजारो संशयास्पद नोंदी उघडकीस आल्याने तब्बल ५,७२९ रेशन कार्डे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तपासणीत १,५५३ दुबार रेशन कार्डे आणि ४,१७६ संशयास्पद आधार क्रमांकांशी संलग्न कार्डे आढळून आली. या गंभीर विसंगतींमुळे संबंधित कार्डधारकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार असून, दोन महिन्यांहून अधिक काळ वापरात नसलेली रेशन कार्डेही बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रेशन व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील ६,५५० रेशन कार्डांची सखोल चौकशी करण्यात येणार असून, अधिक उत्पन्न असलेले, स्वतःची वाहने बाळगणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्यांची कसून पडताळणी केली जाणार आहे.
या मोहिमेदरम्यान प्रशासनाच्या नजरेस एक विलक्षण बाबही आली आहे. जिल्ह्यातील रेशन कार्ड नोंदींमध्ये १०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे तब्बल २,१७८ सदस्य नोंदवले गेले आहेत. या व्यक्ती प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत की केवळ कागदोपत्री, याची खातरजमा करण्यासाठी विशेष पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे. रेशन कार्डधारकांकडे चारचाकी किंवा इतर वाहने आहेत का, याची माहिती विविध शासकीय यंत्रणांच्या नोंदींशी पडताळून पाहिली जाणार आहे. याशिवाय १८ वर्षांखालील ‘एकल सदस्य’ रेशन कार्डधारकांचीही चौकशी केली जाणार असून, ते प्रत्यक्षात निराधार व पात्र आहेत की नाही, याचा शोध घेतला जाणार आहे.
व्यवस्थेतील ‘गळती’ रोखण्याचा प्रयत्न
वर्षानुवर्षे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत शिरकाव केलेल्या बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानावर ताण येत असल्याची बाब वारंवार समोर येत होती. ‘मिशन सुधार’मुळे या व्यवस्थेतील गळती रोखण्यास मदत होईल, तसेच खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत धान्याचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात सुरू झालेली ही मोहीम केवळ रेशन कार्डांची छाननी नसून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि पात्रताधारित बनविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

