(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिरकरवाडा जेटी परिसरात २० वर्षीय तरुण बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ईश्वर रामकृष्ण चौधरी (वय २०, सध्या रा. मिरकरवाडा जेटी, रत्नागिरी; मूळ रा. भजनी/३, काढा, जि. कैलाली, नेपाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ईश्वर चौधरी हा मिरकरवाडा जेटी येथे बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याचे आढळून आले. त्यानंतर खबर देणारे भरत खुशीराम चौधरी आणि इतर साक्षीदारांनी त्याला तातडीने औषधोपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईश्वर चौधरी याची तपासणी केली. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १२५/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण पुढील वैद्यकीय तपासणी व पोलिसांच्या कार्यवाहीतून स्पष्ट होणार आहे.


